कोसला ही कादंबरी पारंपारिक कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडून, यशस्वी तंत्र झुगारून अनपेक्षित, काहीशा विस्कळीत, तऱ्हेवाईक शैलीत लिहिलेली ही कादंबरी आशय आणि आविष्कार या दोन्ही बाबतींत वेगळी आहे. खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे. लग्न, पितापुत्रसंबंध, शिक्षण, राजकारण, अध्यात्म अशा अनेक विषयांचा विचार तो पूर्वसंकेत टाळून करतो. शिकत असताना समवयस्कांचा खोटेपणा, भ्याडपणा, वसतिगृहातील मुलांचे टोळीवजा व्यवहार, दांभिक उथळ प्राध्यापक, लेखक, पुढारी वक्ते यांचा भंपकपणा या साऱ्यांचा अनुभव घेत असता हळूहळू तो समाजापासून तुटत जातो. कधी गंभीरपणे, कधी उद्वेगाने, चिडून किंवा उपरोधाने, कधी तुच्छतेने तो जगण्यातील विसंवाद आणि विसंगती मांडत जातो. अर्थहीनतेची अनेक रूपे टिपत असताना तो भ्रमनिरास आणि विफलता अनुभवतो.
भाषेचा कमालीचा अर्थगर्भ वापर करणारी ही कादंबरी आजही तिच्या वेगळेपणाने उठून दिसते.
जळगांव येथील सांगवी येथे जन्म झालेले भालचंद्र नेमाडे कादंबरीकार, कवी व समीक्षक म्हणून साहित्य जगतात सुप्रसिध्द आहेत. सुरूवातीला त्यांनी नियतकालिकांमधून कविता लिहिल्या. त्यांच्या कवितांचा ‘देखणी’ हा संग्रह प्रसिध्द आहे. उमेदवारीच्या काळातील ‘कोसला’ हया त्यांच्या पहिल्याच कादंबरीने कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडून, भाषेचे एक नवे रूप समोर आणले. आशय आणि आविष्कार या दोन्ही बाबतींत वेगळी ठरणारी ही कादंबरी प्रत्येक पिढीला आपलीच वाटते. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनतर ‘बिढार’, ‘जरीला’ व ‘झूल’ या सर्वच कादंबर्या समकालीन ठरल्या. नेमाडे यांची समीक्षाही त्यांच्या ललित साहित्याइतकीच ताकदीची, साहित्य आणि जीवन यांच्यात फारकत न करणारी आहे.