कविवर्य कुसुमाग्रजांनी आजवर कविता, नाटक, कादंबरी, कथा, ललितनिबंध असे विविध प्रकारचे साहित्य लिहिले. त्यातही त्यांच्या काव्यलेखनाचा ठसा मराठी मनांवर अधिक खोलवर उमटलेला आहे. कुसुमाग्रजांच्या सौन्दर्यदृष्टीचा आणि शैलीचा संस्कार मराठी कवितेवर झालेला आहे. कुसुमाग्रजांची कविता ही, केशवसुतांपासून निर्माण झालेल्या एका वैभवशाली कालखंडात महत्त्वाचा भाग असून ती गेली जवळ जवळ साठ पासष्ठ वर्षे नवनवीन उन्मेशांनी बहरत राहिलेली आहे.
कुसुमाग्रजांच्या छंदोमयी, मुक्तायन व पाथेय य तीन संग्रहातील निवडक कवितांचा प्रवासी पक्षी हा संग्रह असून रसायने नंतरच्या वीस वर्षांतील कुसुमाग्रजांच्या कवितांचे स्वरूप या संकलनाद्वारे वाचकांना एकत्रितपणे पाहावयास मिळेल.
वि. वा. शिरवाडकरांनी काव्य आणि नाटयलेखन केले. काव्यलेखन करताना ‘कुसुमाग्रज’ या नावाने लेखन केले. त्यांच्या रूपाने मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा मानदंड महाराष्ट्राला लाभला. शालेय जीवनातच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. ‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. सुरूवातीच्या काळात त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केले, त्यानंतर काही काळ वृत्तपत्रांतही काम केले.
त्यांच्या लेखनातील काही महत्त्वाचे टप्पे म्हणजे ‘विशाखा’, ‘मारवा’, ‘कालिदासाचे मेघदूत’, ‘पाथेय’, ‘महावृक्ष’, ‘मुक्तायन’ हे त्यांचे कवितासंग्रह, तसेच त्यांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये ‘ययाती आणि देवयानी’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘नटसम्राट’ विशेष लोकप्रिय झाली, ती पॉप्युलरने प्रकाशित केली. १९८८ साली शिरवाडकरांना ‘ज्ञानपीठ’ पारितोषिक देऊन त्यांच्या वाड्.मयीन कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. कल्पनावैभव, उत्कटता, चिंतनशीलता, समाजाभिमुखता आणि राष्ट्रीयता ही शिरवाडकरांच्या लेखनाची वैशिष्टये.