भालचंद्र नेमाडे यांची ‘झूल’ ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर तब्बल तीस वर्षांनंतर ‘हिंदू’ ही कादंबरी प्रकाशित झाली. एवढा दीर्घ लेखनकाळ असलेली ही मराठी साहित्यातील अपवादात्मक आणि तेवढीच बहुचर्चित कादंबरी आहे. पुरातत्त्वविदयेचा अभ्यासक व संशोधक खंडेराव हा कादंबरीचा नायक आहे, त्याच्या भूमिकेतून नेमाडे हिंदू संस्कृतीविषयक आपली वैचारिकता मांडतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दोन धर्मांवरून झालेली भारताची फाळणी, मोरगाववर पेंढार्यांची चाल व लूटालूट, लभानी लोकांचे मोरगावात समरस होणे, मारवाडी समाजासारख्या समाजाचे आपला मूळ प्रदेश सोडून अन्यत्र सामावून जाणे इत्यादींचे वेधक चित्रण या कादंबरीत येते.
हिंदू समाजात अडगळ होऊन बसलेल्या अनिष्ट व्यवस्था व चालीरीती यांचे विविध अंगांनी कादंबरीत चित्रण येते. आपल्या समाजात, कुटुंब व्यवस्थेत स्त्रियांवर होणारा अन्याय, त्यांना भोगावे लागणारे दु:ख हे नेमाडेंच्या सगळयाच कादंबर्यांमधून येणारे आशयसूत्र आहे. सगळया समाजाच्या अंत:स्तरावरच्या सगळया जाणिवा नेमाडे या कादंबरीतून व्यक्त करतात, वाचकाला टोचण्या देतात, अस्वस्थ करतात, अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतात.
जळगांव येथील सांगवी येथे जन्म झालेले भालचंद्र नेमाडे कादंबरीकार, कवी व समीक्षक म्हणून साहित्य जगतात सुप्रसिध्द आहेत. सुरूवातीला त्यांनी नियतकालिकांमधून कविता लिहिल्या. त्यांच्या कवितांचा ‘देखणी’ हा संग्रह प्रसिध्द आहे. उमेदवारीच्या काळातील ‘कोसला’ हया त्यांच्या पहिल्याच कादंबरीने कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडून, भाषेचे एक नवे रूप समोर आणले. आशय आणि आविष्कार या दोन्ही बाबतींत वेगळी ठरणारी ही कादंबरी प्रत्येक पिढीला आपलीच वाटते. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनतर ‘बिढार’, ‘जरीला’ व ‘झूल’ या सर्वच कादंबर्या समकालीन ठरल्या. नेमाडे यांची समीक्षाही त्यांच्या ललित साहित्याइतकीच ताकदीची, साहित्य आणि जीवन यांच्यात फारकत न करणारी आहे.