ग्रेस यांच्यातील लेखक समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असा 'ओल्या वेळूची बासरी' हा ललितबंधसंग्रह. आपल्या निर्मिती प्रक्रियेमागची प्रेरणा, लेखनातील बलस्थाने, लेखन प्रक्रियेविषयीचे चिंतन आणि आत्मपर जाणिवांचा शोध घेत लिहिलेले हे लेख ग्रेस यांच्या उत्कट मन:स्थितीचे चित्रण करणारे आहेत.
गेली काही वर्षे ग्रेस कर्करोगाशी सामना करत आहेत. त्यांच्या वेदनेनेच त्यांना आणखी जोमाने लिहिण्याची प्रेरणा दिली. 'ओल्या वेळूची बासरी' म्हणजे वेदनेतून निर्माण झालेले सुंदर साहित्य आहे. चित्रकार रविमुकुल यांची मांडणी, रेखाचित्रे आणि मुखपृष्ठ हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य.
कवी ग्रेस यांचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा पहिलाच कवितासंग्रह पॉप्युलरच्या ‘नवे कवी: नवी कविता’ या मालिकेतून १९६७ साली प्रकाशित झाला. १९५५ पासून ‘संध्याकाळच्या कविता’, ‘राजपुत्र आणि डार्लिंग’, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’, ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’, ‘सांजभयाच्या साजणी’ या त्यांच्या कवितासंग्रहांनी सर्वसामान्य रसिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचा खास असा वाचक वर्ग तयार होत गेला. समजत नाहीत, दुर्बोध आहेत असा एक सूर या कवितांच्या बाबतीत असला तरी त्यांच्या लेखनाची मोहिनी, ताजेपणा, अद्याप कमी झालेला नाही. आत्मपर आशय असलेले आणि तरीही भावमधुर काव्याची प्रचीती आणून देणारे ‘चर्चबेल’, ‘मितवा’, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’, ‘मृगजळाचे बांधकाम’, आणि ‘वार्याने हलते रान’ या ललितबंधांतून ग्रेसांच्या काव्यातील आशयघन दुर्बोधता सुबोध होऊन जाते.
'वार्याने हलते रान' या ललित लेखसंग्रहात कवी ग्रेस यांनी पुराणकथांच्या, दंतकथांच्या, लोककथांच्या, परीकथांच्या, कधी स्त्रीत्वाच्या आलंबन विभावांच्या, तर कधी स्मरणकथांच्या किंवा अगदी प्रहर व ऋतूंच्याही अनुषंगाने, अखेर निर्मिती व निर्मितीप्रकियेचा वेध घेतला आहे.
कविता असो किंवा ललितबंध; सर्वसामान्य वाचकांबरोबर मराठीतील बहुतेक नामवंत संगीतकारांना आपल्या शब्दांनी मंत्रमुग्ध करणारे, आकर्षित करणारे ग्रेस यांचे प्रत्येक पुस्तक म्हणजे रसिकांसाठी आनंदाची पर्वणी! ‘नवे कवी-नवी कविता’ या पॉप्युलरच्या अभिनव काव्यसंकल्पातून पॉप्युलरला आणि एकूणच साहित्यसृष्टीला ग्रेस हे महत्त्वाचे कवी लाभले.