‘खुंदळघास’ हा अस्सल ग्रामीण शब्द. शेतीवाडी करताना वन्यप्राणी, जनावरे यांच्यामुळे होणार्या त्रासाविषयी शेतकरी नेहमीच वापरतात. उन्हातान्हात, पावसापाण्यात खपून पेरलेले शेत तयार होऊन कापणीला येते आणि अचानक अशा पिकांवर वानरे, रानडुकरे, हरणे अशा प्राण्यांचा घाला पडतो. हातातोंडाशी आलेल्या पिकांत धुडगूस घालून हे प्राणी पिकाचा घास घेतात, ते तुडवतात, खुंदळतात यावरून ‘खुंदळघास’ हा शब्द प्रचारात आला आहे. एका प्रकृतीच्या आणि वेदनेचे सूत्र असलेल्या या संग्रहातील व्यक्तिरेखांचासुध्दा त्यांच्या वाटयाला येणार्या विपरिततेने, अभावग्रस्त प्रतिकूल परिस्थितीने असाच ‘खुंदळघास’ केलेला दिसतो.
सदानंद देशमुख कवी, कथाकार आणि कादंबरीकार म्हणून सुपरिचित आहेत. ‘गावकळा’ हा कवितासंग्रह, ‘तहान’, ‘बारोमास’ या कादंबर्या, ‘लचांड’, ‘उठावण’ ‘महालूट’ ‘रगडा’, ‘खुंदळघास’ हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह. ‘बारोमास’ या कादंबरीला ‘साहित्य अकादेमी’ पुरस्कार मिळाला तसेच अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. अस्सल बोलीभाषेचा वर्हाडी पोत आणि काळया मातीत राबणार्या शेतकर्याच्या जीवनातलं स्वतंत्र मातृकळा असलेलं भाषिक विश्र्व त्यांच्या कथानिर्मितीचं मुख्य वैशिष्टय आहे. बुलढाणा जिल्हयातील अमडापूर या खेडेगावी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यामुळे त्यांच्या आशयविश्र्वाला साक्षात जीवनानुभूतीचा तरल आणि कलात्मक स्पर्श लाभलेला आहे.