या पुस्तकात एकूण दोन नाटके आहेत. 'चारु- आरो' या नाटकात लग्नाचे बंधन टाळून प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची तयारी असणारे एक प्रेमिकांचे जोडपे, त्यांचे एकमेकांशी असलेले नाते,संवाद आहे. प्रस्तुत जोडप्यात आता काही कारणाने दुरावा निर्माण होत आहे. हा दुरावा दोन व्यक्तींच्या जगण्यामागील धारणा भिन्न असण्यातून होत जातो. दोन व्यक्तींमधले संबंध आणि सामाजिक बाबी या दोन्हींमधले अनेक प्रकारचे ताण धर्मकीर्ती यातून उलगडत जातात.
'पाणी' हे जास्त विचारप्रवृत्त करणारे नाटक आहे . सद्यस्थितीतील निरनिराळ्या सामाजिक -राजकीय चळवळींमधील काही प्रश्नांना लेखक अगदी सरळसरळ भिडतो . साधक- बाधक विचार करुन , प्रसंगी आत्मटीकाही करणारा बुद्धिवादी लेखक आणि प्रत्यक्ष चळवळीचे प्रश्न , लढ्यातील व्यूहरचना यांचा विचार करणारा अस्सल कार्यकर्ता या दोघांतील निर्माण होणारा तणाव हा नाटकाचा मुख्य विषय . हा विषय धर्मकीर्ती सुमंत वयापलीकडे जाणार्या प्रगल्भतेने हाताळतात .
नव्या पिढीच्या विचारांना, त्यांच्या मनातील आंदोलनांना मोकळी वाट मिळवून देणारा पॉप्युलर परिवारातील सर्वांत तरुण लेखक म्हणजे धर्मकीर्ती सुमंत. वयाच्या बावीसाव्या वर्षी नाट्यलेखनात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे धर्मकीर्ती हे खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. 'पाणी, चारू आरो इत्यादी' या दीर्घांकाच्या लेखनाने त्यांच्या नाट्यप्रवासास सुरुवात झाली. 'लॉगिंग आऊट', 'छत्तीस', 'आय एण्ड आयडॉल', 'आम्हाला आमचा' या एकांकीकांचे लेखन त्यांनी केले आहे.
प्रायोगिक रंगभूमीवरील धर्मकीर्ती यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना 'विनोद दोषी फेलोशिप इन पराफोर्मिंग आर्टस' ही शिष्यवृत्ती २०१० मध्ये मिळाली. याच वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्यांच्या 'गेली एकवीस वर्षे' या नाटकाची निवड करण्यात आली. भारतीय भाषेतून सादर होणाऱ्या या एकमेव नाटकाला उत्कृष्ट नाट्याचा बहुमान मिळाला. तसेच लंडन येथील रॉयल कोर्ट थिएटरतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या 'प्लेराईट्स वर्कशॉप' साठी धर्मकीर्ती यांची निवड करण्यात आली. संपूर्ण भारतातून फक्त चौदा नाटककारांची या वर्कशॉपसाठी निवड करण्यात आली.
उमेदवारीच्या काळातच राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरांवरून कौतुक होत असलेल्या या तरुण लेखकाची दोन्ही नाटके, त्यातील विचार, पात्रांची भाषा, जगण्यातले संदर्भ आणि आशय यामुळे आजच्या तरुण पिढीला आपलीच वाटतात.