स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अस्पृश्यताविरोधी भूमिकेचा अभ्यास करताना धनंजय कीर यांचे लक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘उद्धरेत आत्मनाम् आत्मानम्’ हया ध्येयाकडे गेले आणि त्यांनी आंबेडकर चरित्रासाठी साधने जमवण्यास सुरुवात केली. त्यांचे लेखन पूर्ण होत आले तोवर बाबासाहेब आजारी होते. तरीही कीरांना आपल्या मनातील अनेक शंकांचा खुलासा करून घेता आला. अशा रीतीने सावरकर आणि आंबेडकर चरित्रांसाठी त्यांनी दस्ताऐवज, त्यांचे समकालीन सहकारी यांचा आधार जसा घेतला त्याचप्रमाणे प्रत्यक्ष चरित्र नायकांचीही पसंती मिळवली.
दरवर्षी विक्रीचा उच्चांक गाठणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या चरित्र ग्रंथाची दखल घेतल्याशिवाय अभ्यासकांचा अभ्यास पूर्ण होत नाही. यामध्ये सनावळया आणि संदर्भग्रंथांच्या उल्लेखाने निवेदन जड होणार नाही याची कीर यांनी काळजी घेतली आहे. बाबासाहेबांच्या लेखनाची सूची, बाबासाहेबांवर झालेल्या लेखनाची सूची, यासोबत आंबेडकरांचा संक्षिप्त जीवनपट या पुस्तकात समाविष्ट आहे त्यामुळे अत्यंत माहितीपूर्ण व चरित्रात्मक राजकीय साहित्यामध्ये मोलाची भर घालणारा हा नवीन रूपातील ग्रंथ आंबेडकरांच्या अनुयायांना, अभ्यासकांना आणि सर्वसामान्य वाचकाला आवडेल असा आहे.
चरित्रकार म्हणून धनंजय कीर यांनी साहित्यजगतात मोलाची कामगिरी केली आहे. सुरुवातीला इंग्रजी वृत्तपत्रांतून त्यांनी लेखन केले. शाळेत असताना वीर सावरकरांच्या विचारांनी प्रभावीत होऊन, त्यांच्या क्रांतिकारक व विचारनिष्ठ विचारांचा त्यांनी अभ्यास सुरू केला आणि 1950 मध्ये ‘सावरकर ऍण्ड हिज टाइम्स’ हा पहिला चरित्रग्रंथ लिहिला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, शाहू छात्रपती, महात्मा फुले या थोर राष्ट्रीय नेत्यांची चरित्रे त्यांनी लिहिली. ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ या त्यांच्या आत्मचरित्रातून एक माणूस म्हणून आणि चरित्रकार म्हणून कीर यांची होत गेलेली जडणघडण विस्ताराने उलगडते. १९७१ साली भारत सरकारने ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांच्या या कार्याचा गौरव केला तर शिवाजी विदयापीठाने ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ हा किताब देऊन त्यांना गौरविले.