पॉप्युलर प्रकाशन आणि महाराष्ट्र सेवा संघ आयोजित ’प्रिय रसिक’ या मुलुंड येथील साहित्यिक कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ‘सांध्यपर्वातील ग्रेस’ हा कवी ग्रेस यांच्या कविता आणि ललितलेखनाच्या जाहीर वाचनाचा कार्यक्रम पार पडला. सुप्रसिद्ध हिंदी गीतकार गुलजार, कवी सौमित्र, नीरजा आणि सतीश सोळांकुरकर हे वाचनात सहभागी होते.
प्रिय रसिक १ में २०१२ : सांध्यपर्वातील ग्रेस
पॉप्युलर प्रकाशन आणि महाराष्ट्र सेवा संघ आयोजित 'प्रिय रसिक’ या मुलुंड येथील साहित्यिक कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी 'सांध्यपर्वातील ग्रेस’ हा कवी ग्रेस यांच्या कविता आणि ललितलेखनाच्या जाहीर वाचनाचा कार्यक्रम पार पडला. सुप्रसिद्ध हिंदी गीतकार गुलजार, कवी सौमित्र, नीरजा आणि सतीश सोळांकुरकर हे वाचनात सहभागी होते.
.jpg)
महाराष्ट्र सेवा संघाच्यावतीने चंद्रशेखर कुलकर्णी यांनी तर पॉप्युलर प्रकाशनच्या वतीने अस्मिता मोहिते यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कवी ग्रेस आज आपल्यात नाहीत असे पॉप्युलर मानत नाही, तर आजही त्यांच्या शब्दांच्या आणि पुस्तकांच्या रूपाने ते आपल्यात आहेत, कायम असतील असे अस्मिता मोहिते यांनी नमूद केले. सोबतच ग्रेस यांच्या 'बाई! जोगियापुरुष’ या नवीन पुस्तकाचे काही कारणास्तव प्रकाशन या दिवशी होऊ शकत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. पण असे असले तरी ग्रेस यांच्या 'सांजभयाच्या साजणी’, 'राजपुत्र आणि डार्लिंग’ आणि 'मृगजळाचे बांधकाम’ या तीन पुस्तकांच्या नवीन आवृत्त्यांचे गुलजार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कवितावाचनापूर्वी पॉप्युलरचे रामदास भटकळ यांनी ग्रेस यांच्याशी चार तपांहून अधिक काळ असलेल्या आपल्या नात्याला शब्दरूप दिले. ग्रेस यांचे अनुभव, आणि त्यांची मांडणी याला कोणतेही तर्कशास्त्र लावता येत नाही. त्यांचे लेखन हे एखाद्या कोलाजाप्रमाणे असते. वर वर पाहताना त्यांचा एकमेकांशी संबंध नाही असे दिसत असले तरी एकसंधपणे त्याकडे पाहिल्यास त्यातून घडून येणारा परिणाम जाणवतो असे भटकळ यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सौमित्र, नीरजा आणि सतीश सोळांकुरकर यांनी ग्रेस यांच्या ’पाऊस’ या विषयावरच्या काही कविता सादर केल्या. तर नीरजा यांनी ग्रेस यांच्या एका ललितबंधाचे वाचन केले. हिवाळा या ऋतूशी ग्रेसांचे एक वेगळेच नाते होते. आयुष्य, बर्फ आणि हिमवर्षावाचे एक विचित्र नाते त्यांनी गुंफले होते ते दाखवून देणार्या काही कविताही वाचल्या गेल्या. त्यानंतर संध्याकाळ ही तर ग्रेस यांची प्रेयसीच म्हणावी लागेल. बहुतेक पुस्तकांच्या शीर्षकातही तिचे अस्तित्व अबाधित आहे. या कातरवेळेला ग्रेस यांनी आपल्या कवितेतून विविध गोष्टींशी जोडले. मृत्यू ही अशीच एक भावना त्यांनी या कातरवेळेशी जोडली त्यावरही आधारित कविता सादर झाली.
आई हा ग्रेस यांच्या चिंतनाचा महत्त्वाचा विषय आणि लेखनामागची आदिम प्रेरणाही म्हणता येईल. ''...तेव्हा कळतो नदीला, या मादीचा सूर’’ तसेच ''ती गेली तेव्हा, रिमझिम पाऊस निनादत होता’’ या शब्दांतून आपल्या आईची विविध रूपे साकारणार्या या कवीला उपस्थितांनी मनापासून दाद दिली. ज्ञानेश्वर, तुकाराम, जी. ए., मेरेलिन मेन्रो यांसारखी कित्येक माणसे कवी ग्रेस यांना खुणावत राहिली. 'ओल्या वेळूची बासरी’ या ललितलेखसंग्रहातील काही लेख या व्यक्तींशी त्यांचे असलेले नाते कसे उलगडतात हे सुद्धा प्रेक्षकांनी वाचनाच्या माध्यमातून अनुभवले. तर 'चर्चबेल’ मधील 'तांदूळ वेचणार्या मुली’ आणि ’चिमण्या’ या दोन लेखांचे वाचन प्रेक्षकांना स्तब्ध करून गेले. चिमणी व्यतिरिक्त कावळा हा एक पक्षी त्यांच्या लेखनात सतत डोकावत राहिला. कावळ्याला त्यांच्या भावविश्वात अबाधित असे स्थान होते. भीती, कारुण्य या भावना त्यांना कावळ्यात दिसत तर त्याचवेळी अनेक स्मृती आणि संदर्भही त्यांनी कावळ्याशी जोडले होते.
गुलजार हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. कार्यक्रमात गुलजार यांना एक सुखद धक्काही अनुभवायला मिळाला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रसाद पवार यांनी गुलजार हे त्यांचे प्रेरणास्थान असल्याचे सांगून स्वत: तयार केलेले गुलजार यांचे पोर्ट्रेट त्यांना अर्पण केले. गुलजार यांनी सुरुवातीलाच ग्रेस यांच्याशी झालेली शेवटची भेट वर्णन केली. ''शेवटचा भेटलो तेव्हा ग्रेस यांची सर्व औषधे बंद केली होती, आता फारच थोडा वेळ हातात उरला आहे याची कल्पना आली. स्वत: ग्रेस यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली हे माझं नशिबच होतं. भेट घेऊन निघताना ''परत येईन’' इतकेच बोलून निघालो. त्याहून वेगळे काय बोलावे कळेना. त्यांना ते दिलेलं वचन पूर्ण करणे माझी गरज होती. आज या कार्यक्रमाला येऊन वचन पूर्ण करण्याची संधी पॉप्युलरने मला दिली आहे. आता ग्रेस एकटे नाहीत, इथे उपस्थित प्रत्येक चेहर्यात मला एक ग्रेस दिसत आहे.’’ या शब्दांत त्यांनी ग्रेसांच्या अनुवादित कवितांच्या वाचनाला सुरुवात केली. 'संकल्प’, 'भिक्षेची कविता’ आणि 'पाऊस’ या तीन कवितांचा अनुवाद गुलजार यांनी सौमित्र यांच्या सोबतीने सादर केला. त्यानंतर 'डॉ. झिवॅगो’ या कवितेचे सादरीकरण कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेणारे ठरले. ग्रेस यांच्या कवितांचा अनुवाद करणे खूप कठीण आहे, त्यांनी टिपलेला तो नेमका क्षण शोधणे, तोच क्षण का? त्यात त्यांनी काय पाहिले हे शोधून काढणे कठीण असते. शिवाय केवळ मनोरंजन करणार्या कविता करणे सोपे असते, पण ग्रेस यांच्या कवितेतील राजकीय आणि सामाजिक भान पाहता हा कवी खरंच किती मोठा होता याची कल्पना येते असेही गुलजार म्हणाले. शेवटी, गालिबचा एक शेर कवी ग्रेस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ म्हणून गुलजार यांनी कार्यक्रमाची सांगता केली.